आम्ही गिरगावकर संस्थेचा पुढाकार
| म्हसळा | वार्ताहर |
दोन वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून म्हसळा तालुक्यातील बहुतांश शाळा उद्ध्वस्त झाल्या होत्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवित असलेल्या ‘आम्ही गिरगावकर’ या मुंबई येथील संस्थेने पुढाकार घेत शाळांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच पुढच्या तीन महिन्यांत आणखीन 200 शाळांची रंगरंगोटी करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी सांगितले.
म्हसळा शाळा नं.1 आणि रा.जि.प. शाळा नेवरूळ या शाळांना आम्ही गिरगावकर या संस्थेच्या माध्यमातून उभारी मिळाली. या शाळांचा रंगरागोटीचा संपूर्ण खर्च या संस्थेमार्फत करण्यात आला. यासाठी सारस्वत बँकेचेही सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहळा प्रांत अधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार समीर घारे, आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलिंद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नायक, सदस्य नागेश पोतदार, दिपक राजपूरकर, रवींद्र लाड, सुनील अंजर्लेकर, संतोष उद्धरकर, अभिजित वळंगरे, संतोष सुर्वे, अजय करंबे, मांदाटणे सरपंच चंदू पवार किशोर मोहिते, एम.एस. जाधव, शिक्षिका खेडेकर, कल्पना पाटील सर्व शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी संस्थाच्या विधायक कामाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रगल्भ ठेवणे अत्यावश्यक असून, आय.पी.एस., आएएस अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने आम्ही या संस्थेचे काम करीत असून, येत्या तीन महिन्यांत आणखीन 200 शाळांची रंगरंगोटी, डागडुगी करण्याचे उद्दिष्ट आहे.
गौरव सागवेकर, अध्यक्ष, आम्ही गिरगावकर