माझे कुटुंब, माझी पेन्शनसह 18 मागण्या
| तळा | प्रतिनिधी |
राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जि.प. कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नगर पालिका, ग्राम पंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने माझे कुटुंब, माझी पेन्शनसह 18 मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करून घेण्यासाठी तळा तहसिल कार्यालय येथे महामोर्चा आंदोलन करण्यात आले. नवीन पेन्शन योजनेमुळे गेली 17 वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भवितव्यच उध्वस्त झालेले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा, अशी प्रधान मागणी व इतर 17 प्रलंबित मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.
मधल्या कालावधीत शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचे धोरण आश्चर्यकारकरित्या जाहिर करण्यात आले. भा.दं. वि. संहिता कलम 353 बाबत कर्मचारी/अधिकारी यांना बाधक ठरणारी सुधारणा करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा इरादा दिसून येत आहे. आरोग्य सेवेबाबत देखील मनुष्यबळाचा कमालीचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या मनस्वी संतापात भरच पडली आहे. मार्च मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. तसेच, उपरोक्त वाढलेल्या अनेक जाचक समस्यांमुळे कर्मचारी, शिक्षकांवरील होत असलेल्या अन्यायात भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील 17 लाख कुटुंबे सांप्रत सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची शीघ्रगतीने पूर्तता झाली नाही तर सदर लोकक्षोभ कमालीचा वाढू शकतो. सदर क्षोभ व्यक्त करण्यासाठी 14 डिसेंबर पासून राज्यातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर जाणार असल्याचेही सदर निवेदनात म्हटले आहे.