लाभार्थ्यांनी घेतला 15 हून अधिक सेवांचा लाभ
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
पाली नगरपंचायत क्षेत्रातील भक्तनिवास क्रमांक 1 येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक 1 अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लाभार्थ्यांना 15 हून अधिक शासकीय सेवांचे लाभ वितरित करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुधागड तालुक्यात यापूर्वी चार मंडळांमध्ये हे शिबीर पार पडले असून हे पाचवे व अंतिम विशेष शिबीर नगरपंचायत क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महसूल, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य आणि महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना सेवा पुरविण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात तहसीलदार उत्तम कुंभार यांचे सूक्ष्म नियोजन आणि समन्वय महत्त्वपूर्ण ठरले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमास पराग मेहता, सुलतान बेनसेकर, आरिफ मणियार, निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे, महसुल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर आडसुळे, साजिद शेख, नकुल पोळेकर, नायब तहसीलदार, तालुका कृषी,अधिकारी सुधागड, सुखदेव वाढणकर पुरवठा निरीक्षण, रूपेश भादिकर जांभुळपाडा मंडळ अधिकार, अंकुश साळवे मंडळ अधिकारी-पेडली, गणेश साळुंखे मंडळ अधिकारी-नांदगाव, यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी, कर्मचारी उपस्थित होते.







