| नागोठणे | प्रतिनिधी |
मार्शल आर्टस् स्पोर्टस् अकॅडमी रायगड यांच्या वतीने ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्कार सोहळा पेण येथे नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, वैद्यकीय, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना ‘महाराष्ट्ररत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात नागोठण्याजवळील पाले (पो. मेढा) येथील सानवी संदीप खांडेकर हिला क्रीडा क्षेत्रातील कराटे प्रकारात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सानवी खांडेकर रोहा येथे शिक्षण घेत असून ती लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. तिने जिल्हा व राज्य स्तरावरील विविध कराटे स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके मिळविली आहेत. तिच्या या कार्याची दखल घेऊनच सानवी खांडेकरला मारुती महाराज कोल्हटकर यांच्या हस्ते ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सानवी हिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.







