। नाशिक । प्रतिनिधी ।
रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत रविवारी (दि.26)ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार्या महाराष्ट्र संघाने दणदणीत विजयाची नोंद केली आहे. नाशिकला झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणार्या बडोदा संघाला तब्बल 439 धावांनी पराभवाचा धक्का दिला. महाराष्ट्राचा हा 6 सामन्यांतील केवळ दुसराच विजय आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. परंतु, दुसर्या टप्प्यात बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राने सर्व विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. ऋतुराजनेही गोलंदाजांचा योग्य वापर करत बडोद्यावर सातत्याने दबाव ठेवण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या विजयात सौरभ नवलेने मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल 617 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याला दुसर्या डावात 36 षटताच सर्वबाद 177 धावाच करता आल्या. या डावात बडोद्याकडून अतित शेठ 51, ज्योत्सनील सिंग 40, कर्णधार कृणाल 6, शिवालिक शर्मा 10, विष्णू सोलंकी 24, मितेष पटेल 13 आणि लुकमन मेरीवाला 10 धावा केल्या. महाराष्ट्राकडून गोलंदाजी करताना या डावात मुकेश चौधरीने सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच, रजनीश गुरबानीने 3 बळी, तर रामकृष्ण घोष याने 2 बळी घेतले.
तत्पुर्वी या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 98.4 षटकात सर्वबाद 297 धावा केल्या होत्या. या डावात सौरभ नवलेने 152 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती. तसेच, सिद्धेश वीर याने 48 धावा केल्या होत्या. बाकी खेळाडूंनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. रामकृष्ण घोषनेही 26 धावा केल्या, तर यश क्षिरसागरने 30 धावा केल्या. ऋतुराजला मात्र या डावात 10 धावाच करता आल्या.