दर मंगळवारी सकाळ-संध्याकाळी काम सुरु
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढत्या औद्योगिकरणामुळे नागरिकीकरणही झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकीकरीणामुळे विजेची मागणीदेखील प्रचंड वाढू लागली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच सतत खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात विज तारा, विद्यूत खांबाना अडकाठी येणाऱ्या फांद्या कटाईचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरु केले आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी वीस दिवस शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना विजेचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही कामे केली जात असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दीड हजार पेक्षा अधिक लहान मोठे उद्योग धंदे असून पाचशेहून अधिक मोठ मोठे प्रकल्प आहेत. जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ मोठ्या इमारती जिल्ह्यात उभ्या राहू लागल्या आहेत. ग्रामीण भागासह अनेक भागांमध्ये शहरीकरणही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणीदेखील प्रचंड जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे साडेसहा लाख वीज ग्राहक असून सुमारे 750 कंपन्यांमध्ये उच्च दाब वाहिनीमार्फत विज पुरवठा केला जात आहे.
पावसाळ्यात झाडे कोलमडण्याची भितीअसून फांद्या तुटण्याचाही धोका अधिक आहे. निसर्ग चक्री वादळामध्ये अनेक झाडे कोलमडून पडल्याने विज तारा, विद्यूत खांब तुटले. त्याचा परिणाम दोन ते तीन महिने नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरण विभागाने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुतर्फा व अन्य ठिकाणी असलेल्या झाडांची वाढ मोठी होऊ लागली आहे. या झाडांच्या फांद्या विद्यूत तारा खांबासाठी अडथळा ठरत आहे. अनेक वेळा सतत विज पुरवठा खंडीत होणे. व्होल्टेज वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी महावितरण विभाग कामाला लागले आहे. दर मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा खंडीत करून देखभाल दुरुस्तीसह झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम केले जात आहे.
अधिक व्होल्टेजचा ग्राहकांना फटका
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील गावात रात्री गाढ झोपेत असताना गेल्या पंधरा दिवसापुर्वी अचानक अनेक घरांतील विद्यूत दिवे, फ्रीज, इन्व्हर्टरमधून धुर येऊ लागला. या विद्यूत उपकरणांमध्ये अचानक बिघाड झाल्याने गावांतील नागरिकांची झोप उडाली. गावातील मुख्य विद्यूत वाहिनीची तार तुटल्याने हा प्रकार घडला. प्रत्येक घरात 380 ते 430 पर्यंतचा व्होल्टेज वाढला होता. त्यामुळे उपपकरणांमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे गावांतील 40 पेक्षा अधिक घरांतील विद्यूत उपकरणे बंद पडली. फ्रीज, पंखा, ए.सी. विद्यूत दिवे अशा अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका या अधिक व्होल्टेजचा बसला. मात्र या नुकसान झालेल्या नागरिकांची साधी विचारपुसदेखील करण्यास महावितरण विभागाचे अधिकारी उदासीन ठरले आहे. महाजने येथे विद्यूत पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी वाढत असताना, त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यास महावितरण विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नाराजीचे सुर उमटत आहेत.