महावितरणचा वीजचोरांना दणका

राज्यभरात तीन दिवसांत 250 वीजचोरीची प्रकरणे उघड; 6 कोटी 27 लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

| मुंबई | प्रतिनिधी |

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यात अवघ्या तीनच दिवसात राबविलेल्या वीजचोरी मोहिमेत वीजचोरी व अनधिकृत वीज वापराची 250 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत 6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून, कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.

वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात 53, पुणे 73, छत्रपती संभाजीनगर 56 आणि नागपूर प्रादेशिक विभागात 68 अशा एकूण 250 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. वीजचोरी प्रकरणांचे मूल्यांकन झाले असून, 6 कोटी 27 लाख रूपयांच्या वीजचोरीचे बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आले आहे. वीजचोरीचे देयक व दंडाचा भरणा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेत 240 ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर अनधिकृत वीज वापर प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा विहित मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गीते यांनी केले आहे.

Exit mobile version