महावितरणकडून कारवाई केली जाणार का?
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महावितरणच्या खांबाला फलक व अन्य काही लावणे धोकादायक आहे, असे महावितरण अधिकाऱ्यांकडून बोलले जाते. तरी देखील मात्र अलिबागमधील महायुतीच्या उमेदवारांचे फलक अलिबाग शहरातील विद्युत खांबालाच लावण्यात आले आहे. महावितरण विभागाची कोणतीही परवानी न घेता लावण्यात आलेल्या फलकाबाबत संबंधितांविरोधात कारवाई होणार का, असा सवाल अलिबागकरांकडून उपस्थित केला जात आहे.
अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. प्रचारासह वेगवेगळ्या उमेदवारांकडून स्वतःची जाहिरातबाजी केली जात आहे. फलक लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलिबाग शहरामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या जाहिरातीचा फलक लावण्यात आला आहे. हा फलक महावितरण कंपनीच्या विद्युत खांबालाच लावण्यात आला आहे. विद्युत खांबाला फलक लावल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोलावर चढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. फलक लावताना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्युत खांबावर फलक लावणे धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. तरीदेखील महायुतीच्या उमेदवारांकडून नियमांचे उल्लंघन करीत विद्युत खांबाला फलक लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे याबाबत शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.
विद्युत खांबाला फलक लावणे चुकीचे आहे. तो पोल खराब झालेला असल्यास फलक लावणारा पडण्याची भीती आहे. अत्यावश्यक कालावधीत बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना पोलावर चढण्यास अडथळे निर्माण होत आहे. पोलावर फलक लावणे धोकादायक आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही.
महावितरण विभागाचे अधिकारी
नाव न सांगण्याच्या अटीवरून
