पोलिसांचीच वाहने नो पार्कींगमध्ये
| अलिबाग | प्रतिनिधी |
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरात नो पार्कीगचे फलक बसविण्यात आले आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन नियम करणाऱ्या पोलीसांकडूनच होत असल्याचे समोर उघड झाले आहे. नो पार्कींग झोनमध्ये अन्य वाहन चालकांचे वाहन असल्यास पोलीस कारवाई करतात. प्रत्यक्षात नियम मोडत पोलीसांचे वाहन पार्कींग केल्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उत येऊ लागले आहे.
वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच पर्यटन वाढीमुळे अलिबाग शहराला प्रचंड महत्व वाढत आहे. अलिबाग शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शहरातील रस्ते अपुरी पडत आहेत. अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तरीदेखील काही वाहन चालक बेशिस्तपणे वाहन पार्कींग करून वाहतूक कोंडी करीत असल्याचे प्रकार जिल्हा वाहतूक शाखेच्या लक्षात आले. शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील अनेक भागात नो पार्कींगचे फलक लावण्यात आले आहे. अरुणकुमार वैद्य हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरम्यान पाच ते सहा ठिकाणी नो पार्कींगचे फलक बसविण्यात आले आहे. हा परिसर नो पार्कींग झोन बनला आहे. पोलीस कारवाई करतील या भितीने अनेक वाहन चालक या नो पार्कींग झोनमध्ये वाहने पार्कींग करीत नाहीत. मात्र या नो पार्कींग झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करीत पोलिसांकडून वाहने पार्कींग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्यांना वेगळा नियम व पोलीसांना वेगळा नियम का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी दुपारी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात जिल्ह्याभरातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची वाहने नो पार्कींग झोनमध्ये पार्कींग केली होती. रस्त्याची एक बाजू पोलीसांच्या वाहनाने फुल्ल झाली होती. त्यामुळे या पोलीसांच्या वाहन चालकांविरोधात कारवाई होईल का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.