गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्याकडून अभिनंदन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

उरण पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) वर्चस्व कायम राखत गटनेतेपदी महेश महादेव म्हात्रे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर शेकापचे चार सदस्य बहुमताने निवडून आल्यानंतर गटनेतेपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महेश म्हात्रे यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या निवडीबाबत शेकापच्या वतीने बुधवारी (दि. 4) जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकृत पत्र सादर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे पत्र स्वीकारले.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी महेश म्हात्रे तसेच पंचायत समिती सदस्य निर्मला नरेश घरत, अविनाश गावंड आणि प्रियांका अविनाश गावंड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तालुका चिटणीस रवि घरत, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रमाकांत पाटील, माजी सभापती नरेश घरत, माजी सरपंच अनंत घरत, माजी सभापती ॲड. सागर कडू, दीपक मढवी, सुरेश पाटील, सिताराम नाखवा, वैशाली पाटील, जासईचे सरपंच संतोष घरत, धीरज घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण पंचायत समितीमध्ये शेकापचे चार सदस्य बहुमताने निवडून आल्यामुळे पक्षाची ताकद अधिक दृढ झाली आहे. गटनेतेपदी महेश म्हात्रे यांची निवड झाल्याने आगामी काळात पंचायत समितीतील विविध विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version