निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती

हरिहरेश्वर देवस्थानचा स्तुत्य उपक्रम

| श्रीवर्धन | वार्ताहर |

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर संस्थेच्या वतीने मंदिरातील पवित्र निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्यास प्रारंभ झाला आहे. नुकताच या अगरबत्तीचा अनावरण समारंभ पार पडला.

हरिहरेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता मंदिरामध्ये वाहण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील फुलांचे विघटन कसे करावे, हा प्रश्न संस्थेपुढे होता. यासाठी काहीतरी ठोस कृती व्हावी याकरिता संस्थेचे सचिव खजिनदार सिद्धेश पोवार यांनी निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याबाबत विश्वस्त मंडळासमोर चर्चा केली. यावर सर्वांनी होकार दिला. योगायोगाने पुणे येथील अगरबत्ती उत्पादक श्रीराम कुंठे यांच्याशी त्यांची भेट होऊन चर्चाही झाली. त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर फुकट जाणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याच्या कामास मंदिर समितीमार्फत प्रारंभ झाला. नुकतेच या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले.

याकामी हरेश्वर येथील ग्रामस्थांनीही आपल्या घरातील पूजेचे निर्माल्य मंदिरात आणून द्यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. निर्माल्यापासून बनविलेली अगरबत्ती मंदिराचे देणगी कक्ष कार्यालयात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. संस्थेचे सचिव-खजिनदार सिद्धेश पोवार हे मंदिर संस्थेच्या हितासाठी व प्रगतीसाठी नेहमीच काही ना काही उपक्रमांच्या माध्यतून प्रयत्नशील असतात. फुकट जाणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याचा उपक्रमही त्याचाच एक भाग असून, अशा सर्व विधायक कार्यांत मंदिर समितीचेही त्यांना उत्तम सहकार्य वेळोवेळी लाभत असते.

Exit mobile version