| पनवेल | प्रतिनिधी |
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांची रक्कम कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटमध्येच अडकवून ती परस्पर लांबवणाऱ्या चोरट्याला तळोजा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अकिब मो. इर्शाद खान (22) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सीसीटीव्ही कमांड सेंटरमधील अंमलदारांची सतर्कता आणि बीट मार्शलच्या तत्परतेमुळे ही कारवाई शक्य झाली. तळोजा येथे राहणारा अकिब खान हा एटीएमच्या कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटमध्ये विशेष प्रकारची पत्र्याची पट्टी अडकवून ग्राहकांची रक्कम बाहेर न पडता स्लॉटमध्येच अडकवण्याची युक्ती वापरत होता. त्यानंतर ग्राहक निघून गेल्यानंतर अडकलेली रक्कम काढून घेण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
तळोजा फेज-1 येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये अकिब हा कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटमध्ये पत्रा अडकवत असताना त्याची संशयास्पद हालचाल सीसीटीव्ही कमांड सेंटरमधील पोलिसांच्या निदर्शनास आली. कमांड सेंटरमधील अंमलदारांनी तत्काळ गस्तीवरील पोलिसांना माहिती देत संशयिताचा फोटो व व्हिडीओही पाठविला. माहिती मिळताच बीट मार्शल-1 वर गस्त घालणारे पोलीस हवालदार लुवीस मोजेस लॉजरेस आणि पोलीस शिपाई अभिजीत इनामदार यांनी तातडीने एटीएम केंद्र गाठले. एटीएमची पाहणी केली असता कॅश डिस्पेन्सिंग स्लॉटजवळ डबल चिकट टेप लावलेली निळ्या रंगाची सुमारे 2.5 इंच रुंद, 10 इंच लांब आणि 1 इंच जाडीची पोकळ पत्र्याची पट्टी आढळली.
पोलिसांनी ही पट्टी ताब्यात घेतल्यानंतर एटीएमबाहेर संशयिताचा शोध घेतला असता सीसीटीव्ही कमांड सेंटरमधून पाठविण्यात आलेल्या छायाचित्रातील व्यक्ती अकिब खान रस्त्यावर उभा असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती ग्राहकांची रक्कम लांबवली आहे, याचा तपास तळोजा पोलीस करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या चौकशीतून या प्रकारातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.






