शिवशंभो पाटणेश्‍वर ठरला सहयाद्री चषकाचा मानकरी

। पेण । वार्ताहर ।
सहयाद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सहयाद्री चषक 2022 चे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान (कोठला मैदान) वाशी, पेण येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम लढत शिवशंभो पाटणेश्‍वर विरूध्द वायुसुत ओढांगी यांच्यामध्ये झाली. यामध्ये सहा गुणांनी शिवशंभो पाटणेश्‍वर संघाने वायुसुत ओढांगी संघावर मात करून विजय संपादन केले.
अंतिम सामना सह्याद्री पाटणेश्‍वर विरुद्ध वायुसुत ओढांगी असा झाला.क्रीडा रसिकांनी एकतर्फी वायुसुत ओढांगी जिंकेल असे भाकीत केलेले असताना पहिल्या मिनिटापासून सामन्यात दोन्ही संघ सावध पवित्रा घेउन खेळताना दिसले. मध्यांतरापर्यत वायुसुत ओढांगी हा संघ एक गुणाने आघाडीवर होता मात्र नंतर शिवशंभो पाटणेश्‍वर संघाकडून अंलकार म्हात्रे, आकाश म्हात्रे, आणि विकी ठाकूर यांनी ओढांगीच्या डिफेंन्सच्या दाणादाण उडवली. मात्र शेवटचे दोन मिनिट असताना सामना पुन्हा बरोबरीत आला. पाटणेश्‍वरच्या अंगणात तीनच खेळाडू शिल्लक राहिले होते. वायुसुत ओढांगी सहज सामना जिंकेल असे चित्र दिसत असतानाच सागर म्हात्रे, हर्ष म्हात्रे, आणि रसिक यांने ओढांगीचा स्टार खेळाडू जितेश पाटील याला सुपर ट्रॅकल करून दोन गुण मिळवले. त्यानंतर पाटणेश्‍वरच्या अंलकार म्हात्रे यांनी चढाई केली असता बोथ आउट चा निर्णय पंचानी दिला. त्यानंतर वायुसुत ओढांगीचा मंदार पाटील यानी पाटणेश्‍वरच्या अंगणात चढाई मारली मात्र पुन्हा सागर म्हात्रे, हर्ष म्हात्रे, रसिक या त्रिकुटांनी कमाल करत सुपर ट्रॅकल करून दोन गुण मिळवत चार ची आघाडी घेतली. त्यानंतर शेवटी चढाई आकाश म्हात्रे यांनी मारत दोन गुणांची कमाई करून 13 विरूध्द 19 असा शिवशंभो पाटणेश्‍वर संघाने विजय संपादन केला.
विभागीय कबड्डीला नवसंजिवनी मिळण्याच्या दृष्टीने समीर म्हात्रे यांनी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे आयेाजन सुटसुटीत आणि देखणे झाले. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सहयाद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते महेश कोकाटे (अनाजीपंत), रमेश रोकडे(हिरोजी फ।र्जद), महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियनचे जे.जे.पाटील, राष्ट्रीय कबड्डी पट्टू मारूती म्हात्रे, अर्वजुन हजर होते. तर मा.आमदार धैर्यशील पाटील यांनी या नेटनेटक्या कबड्डी आयोजनाबाबत युवा नेते समीर म्हात्रे यांचे कौतुक करून लाल मातीतील कबड्डी जीवंत ठेवण्यासाठी भविष्यात असेच प्रयत्न करत राहण्याचा सल्ला देखील या वेळी धैर्यशील पाटील यांनी दिला.
या स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त तहसिलदार सुभाष म्हात्रे, बा.ही.म्हात्रे, वसंत म्हात्रे, मा.पोलिस पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, पांडुरंग पाटील, लाल ब्रिगेट तालुका संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, दिव सरपंच विवेक म्हात्रे, अंतोरे सरपंच अमित पाटील, विकास म्हात्रे, मारुती म्हात्रे, सुरेश म्हात्रे, एकनाथ वर्तक, राकेश वर्तक, अदींच्या हस्ते झाले.
अंतिम चार संघामध्ये शिवशंभो पाटणेश्‍वर, वायुसुत ओढांगी, जय हनुमान उचेडे, गावदेवी मोठे वढाव, या संघांनी धडक मारली. पहिली सेमी फायनल वायुसुत ओढांगी विरुध्द गावदेवी मोठेवढाव तर दुसरी सेमी फायनल शिवशंभो पाटणेश्‍वर विरुध्द जय हनुमान उचेडे यांच्यामध्ये झाली. या दोन्ही सेमी फायनल मधुन फायनलमध्ये वायुसुत ओढांगी विरुध्द शिवशंभो पाटणेश्‍वर अंतिम फेरीत पोहोचले.
स्पर्धेत उत्कृष्ट चढाई म्हणून वायुसुत ओढांगीचा जितेश पाटील, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून विकी ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे बक्षिस वितरण आयेाजक समिर म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, दिव सरपंच विवेक म्हात्रे, अंतोरा सरपंच अमित पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले तर या स्पर्धेचे समालोचन सुभाष टेंबे, रुपेश डाकी, विश्‍वनाथ पाटील, विजय म्हात्रे, सुहास म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version