| अलिबाग | प्रतिनिधी |
मांडवा-अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया ही प्रवासी जलवाहतूक मंगळवारपासून दि. 26 मे बंद करण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत मांडवा बंदर कार्यालयाने पावसाळी हंगामात अंतर्गत जलवाहतुकीवर निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा 26 मे ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मांडवा बंदर निरीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी तसेच मोरा बंदरे समूह, ठाणे येथील प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी मे. गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था, मे. गेटवे फ्लोटिंग जेट्टीज अँड टर्मिनल्स प्रा. लि., मे. मालदार्कनेस 505 पॅसेंजर को-ऑप हाऊसिंग सोसायटी आणि मे. पीएनपी इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या काळात मांडवा-गेटवे मार्गावरील सर्व प्रवासी बोटींची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







