आई आयलो आम्ही…
। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाकाळात सगळ्याच सण सोहळ्यांवर निर्बंध आल्याने भक्तगणांमध्ये नाराजी पसरली होती. परंतू, आता सर्व निर्बंध हटविले असून याच पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे 8 एप्रिलच्या पालखी सोहळ्यासाठी साखर आक्षीतील मंगलमूर्ती युवा मंडळाची पालखी पायी चालत एकविरेला निघाली आहे.
मंगलमूर्ती युवा मंडळाची पालखी नेण्याचे हे 12 वे वर्ष असून मंगळवारी (दि.5) सकाळी 7 ला ही पालखी निघाली असून या पालखी सोहळ्यात जवळपास 200 भाविक सहभागी झाले आहेत.
ही पालखी पायी चालत नेत असल्याने सर्व भक्तगण मध्ये-मध्ये थांबा घेत जात असतात. त्यामुळे पहिल्याच दिवशीच्या दुपारच्या जेवणासाठी अलिबाग येथील पात्रूबाई मंदिर येथे थांबणार असून पोयनाड येथे पहिली वस्ती करून पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी 4 ला निघून साजगाव येथील बोंबल्या विठोबा येथे दुसरी वस्ती करणार आहेत. तर, तिसर्या दिवशी ही पालखी एकविरेला पोहोचणार आहे. तसेच ही पालखी खांद्यावर आलटी-पलटी करत एकविरेपर्यंत नेतात.