अर्धवट काँक्रिटीकरण प्रवाशांच्या मुळावर
| माणगाव | प्रतिनिधी |
याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासनाने अक्षम्य डोळेझाक चालवली आहे. खड्डे भरण्यासाठी आ. भरत गोगावले यांनी निधी दिला, परंतु तो अपुरा असल्याने उर्वरित खड्ड्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे बसस्थानक आवारातील खड्ड्यांतील चिखलातून प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे हे अर्धवट काँक्रिटीकरण प्रवाशांच्या मुळावर आले आहे.
नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव बसस्थानकातील काँक्रिटीकरणासाठी 16 लाख रुपये आ. भरत गोगावले यांनी पाठपुरावा करून मंजूर करुन घेतले. हा निधी अपुरा पडल्याने उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात केले जाईल, असे आश्वासन आ. गोगावले यांनी दिले होते. उर्वरित बसस्थानक आवार खड्डेमुक्त करण्यासाठी आणखीन निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र, उर्वरित पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे बसस्थानकात खड्डे पडले असून, या खड्ड्यांत चिखल आणि गाळ साचल्याने प्रवासी नागरिकांना या चिखलातूनच बसस्थानकात जाण्या-येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनाने जिल्हातील बसस्थानके सुशोभिकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार या बसस्थानक आवारातील उर्वरित काँक्रिटीकरण पूर्ण करणे, गटारे काँक्रिटीकरण, बस आगाराचे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, याला आता आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असली तरी प्रवाशांना मात्र बसस्थानकातील चिखल आणि खड्ड्यांतील साचलेल्या पाण्याशी तोंड द्यावे लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत. आ. भरत गोगावले यांच्याकडून निधी मंजुरीची प्रक्रिया प्रगती पथावर असून, येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल.
विपुल उभारे, जिल्हाप्रमुख युवासेना द. रायगड