आंबा उत्पादक ‌‘वर्षा’वर धडकणार

तुटपुंज्या भरपाईविरोधात शुक्रवारी मुंबईत मोर्चा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली प्रतिहेक्टर 22 हजार 500 रुपयांची नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत कोकणातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. सरकारने “कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली” असल्याची तीव्र भावना व्यक्त करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. येत्या शुक्रवारी (दि. 15) गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‌‘वर्षा’पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

कोकणातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण आंबा आणि काजू पिकांवर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 1 लाख 20 हजार हेक्टर, सिंधुदुर्गमध्ये 38 हजार हेक्टर, तर रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. त्यापैकी 13 हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम मानले जाते. रायगड जिल्ह्यात काजू लागवडीचे क्षेत्र सुमारे 2 हजार 200 हेक्टर असून, श्रीवर्धन, तळा, म्हसळा आणि रोहा या तालुक्यांमध्ये काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या फळपिकांमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो, तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होते. मात्र, यंदा बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू उत्पादकांना बसला आहे. वाढत्या तापमानामुळे आंब्याची मोहर प्रक्रिया थांबली, तर अनेक ठिकाणी आलेला मोहर उष्णतेमुळे करपून गेला. परिणामी, यंदा आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून, केवळ दहा टक्के उत्पादन मिळाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

आंबा आणि काजू उत्पादनातील मोठ्या घटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आंबा उत्पादकांना प्रतिहेक्टर पाच लाख रुपये, तर काजू उत्पादकांना प्रति हेक्टर तीन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती.

मात्र, राज्य सरकारने केवळ 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या तुटपुंज्या मदतीविरोधात आता कोकणातील शेतकरी संघटित होत असून, शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या मोर्चात रायगडसह संपूर्ण कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

“हा केवळ मोर्चा नाही, तर कोकणातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. शासनाने वेळेत न्याय दिला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, रायगडसह संपूर्ण कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले आहे.

Exit mobile version