। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील मनोर येथे 2018 साली ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, सहा वर्षे उलटूनही या इमारतीचे काम 90 टक्केच पूर्ण झाले आहे. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी वैतरणा नदीच्या पात्रातून पाणी आणण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी अजूनही सुमारे साडेचार किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम प्रलंबित आहे. या प्रकल्पातील 37 कोटी रुपये प्रलंबित असल्याने ते काम रखडले आहे. 2022 साली 200 खाटांच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीच्या उभारणीचे काम सुरू झाले. या इमारतीचे काम आता 73 टक्के पूर्ण झाले आहे. 209 कोटींची तरतूद करून उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलसाठी 148 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. 2024 साली केंद्र सरकारकडून जवळपास 150 कोटी रुपये राज्य सरकारला देण्यात आले. मात्र, निधी उपलब्ध होऊनदेखील निधी देण्यात आला नसल्याने सिव्हिल रुग्णालयाचे काम रखडल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले आहे.