। पालघर । प्रतिनिधी ।
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच मंगळवारी (दि.7) पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू व तलासरी तालुका भूकंपाने हादरून गेला. बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा या परिसरात एकामागोमाग एक भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐन थंडीत झालेल्या भूकंपामुळे अनेक जण जीवाच्या आकांताने घराबाहेर पळत होते. या भूकंपाची 3.7 रिश्टर स्केलची नोंद झाली असून केंद्रबिंदू गुजरातच्या वलसाडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. भूकंपाच्या हादर्यांमुळे काही घरांना तडे गेलेले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतच आहेत. विशेषतः 2018 पासून डहाणू, तलासरी या भागात मोठ्या प्रमाणावर याआधीही अनेकदा भूकंप झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी पहाटे पुन्हा भूकंप झाल्याने परिसरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. ग्रामस्थ गाढ झोपेत असताना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, वारकस, दापचरी, वरखंडा, चारोटी, कासा, अंबोली, अंबेसरी, सायवन, मोडगाव, नारेसवडी, हळदपाडा येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरम्यान, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी महसूल अधिकारी व कर्मचार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.