वीजनिर्मिती यंत्रणेचे 80 टक्के काम पुर्ण
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती करणार्या यंत्रणेचे 80 टक्के आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. 20 टक्के काम शिल्लक आहे. वर्षभरात ते पूर्ण करून राज्यात मागणीच्या वेळी या प्रकल्पातून सक्षमतेने वीज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली. नव्या वर्षात कोयना प्रकल्प वीजनिर्मिती करण्यासाठी पुन्हा नव्याने सज्ज असेल, असा विश्वास मुख्य अभियंता चोपडे यांनी व्यक्त केला आहे.
वीजनिर्मिती करणार्या संचामध्ये काही वर्षांपासून सातत्याने बिघाड सुरू होता. दुरुस्तीसाठी काही मशीन दीर्घकाळ बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे प्रकल्पातून पूर्णक्षमतेने वीजनिर्मिती करता येत नव्हती. त्याचा परिणाम राज्याच्या वीजनिर्मितीवर होत होता. 2021 मध्ये चिपळूणमध्ये महापूर आला होता. पोफळी, अलोरे परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मितीवरही परिणाम झाला होता. कोयना प्रकल्पाची उभारणी करून 60 वर्षे झाली. तेव्हा बसवलेली यंत्रे कालबाह्य झाल्यामुळे त्याचे सुटे भागही बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे वीजनिर्मिती करणार्या संचाची दुरुस्ती कशी करावी, असाही प्रश्न महानिर्मिती कंपनीसमोर होता.
तसेच, नवीन मशीन घ्यायचे झाल्यास त्यासाठी शेकडो कोटींचा खर्च महानिर्मिती कंपनीला येणार होता. त्यामुळे आहे त्या मशीनचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी पोफळी येथील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आधुनिकीकरणाला गती दिली. प्रथम पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील जुनी यंत्रणा बदलली. त्यानंतर तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील कालबाह्य झालेली यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवली. जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. वर्षभरात उर्वरित काम पूर्ण होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.