। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरीच्या समुद्रात तामिळनाडूच्या मलपी वेगवान मासेमारी नौकांनी हैदोस मांडला आहे. समुद्राच्या तळापासून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंतचा मासा अक्षरशः खरवडून नेला जात आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. परप्रांतीय नौका अशा प्रकारे मासा मोठ्या प्रमाणात जाळ्यात पकडून नेत आहेत. परंतु, स्थानिक पातळीवर मासे मिळण्याच्या मुद्यावर पारंपरिक मच्छीमार पर्ससीननेट मासेमारीवर उंगलीनिर्देश करत आहेत. या परप्रांतीय नौकांना आवरणे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेलाही जड जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. स्थानिक मच्छीमार नौकांच्या मासेमारीवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत. मासळी मिळतच नसल्याने सन 2021 -22 च्या तुलनेत गेल्यावर्षी तब्बल 416 नौका कमी झाल्या आहेत. नौका कमी होऊनही त्यांना मासळी मिळण्याचा रिपोर्टही फारच कमी होता. सन 2021-22 च्या तुलनेत गेल्या वर्षी तब्बल 38 हजार 511 मे. टनने मासळी कमी मिळाली. जिल्ह्यात 2 हजार 520 मच्छीमार नौका आहेत. पारंपरिक नौकांसह यातील पर्ससीननेट नौकांना सुद्धा मासळी कमी मिळाली. यातून पर्ससीननेट आणि पारंपारिक मच्छीमारांमध्ये दरवर्षी वाद होतात ते आजही सुरुच आहेत. परंतु, मासळी कमी मिळण्याचे प्रमाण परप्रांतीय मलपी नौकांमुळे होत आहे, याकडे कुणाचेच लक्ष नाही.