समस्या तात्काळ सोडविण्याची मुख्याधिकार्यांकडे मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पर्यटनाबरोबरच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबाग शहरात अतिक्रमण, अपुरा पाणी पुरवठा, अनधिकृत हातगाड्यांमुळे होणारा वाहतूकीस अडथळा, मासळी व भाजी मार्केटमध्ये होणारा कचरा याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त केला आहे. समस्यांबाबत मानसी म्हात्रे आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्याधिकारी यांची मंगळवारी (दि.14) भेट घेऊन समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप नाईक व माजी नगरेसवक अनिल चोपडा आदी उपस्थित होते.
अलिबाग शहर हे रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. शहरामध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय आदी विविध सरकारी कार्यालये आहेत. अलिबाग शहराला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. नोकरी व्यवसायानिमित्त अलिबागमध्ये येणार्यांची संख्या प्रचंड आहे. तसेच, पर्यटकांचीदेखील वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूका झाल्या नाहीत. अलिबाग नगरपरिषदेवर देखील प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरामध्ये नियोजन शुन्य काम चालू आहे. नागरीकांच्या दैनंदिन समस्यांकडे पुर्णपणे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे.
शहरामध्ये वाहतुकीचे कोणतेही नियोजन राहिलेले नाही. शहरात ज्या ज्या ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत, त्या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील एसटी बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात खाद्य दुकाने, हातगाडया, गजरेवाले या सर्वांनी मुख्य रस्त्यावर व्यावसायाचे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या अपघाताच्या अनेक घटना होऊन स्थानिक नागरीकांना जीव गमवावा लागला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे हातगाड्या चालक वाढले आहेत. मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांचा वावर प्रचंड झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत.
त्याचबरोबर शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कोळीवाडा, चावडी मोहल्ला, ब्राम्हण आळी, चेंढरे, तळकर नगर अशा अनेक भागात अनियीमत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलिबाग शहरात कचर्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. मासळी मार्केट, भाजी मार्केट येथील कचरा वेळेत न उचलल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. पावसाळी गटारे स्वच्छता आजही अपूर्ण स्थितीत आहेत.
या सर्व समस्यांकडे अलिबाग नगरपरिषद प्रशासनाकडून दूर्लक्ष झालेला आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला कळवूनदेखील त्या समस्यांचे निराकरण करण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे. त्यामुळे शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शनिवारी (दि.17) सकाळी दहा वाजल्यापासून नगरपरिषद प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, अशा इशारा दला आहे. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांना निवेदन दिले आहे.