। तळा । प्रतिनिधी ।
तालुक्यात भारनियमनामुळे वीज गायब होण्याचे प्रमाण जास्त आहे. दर मंगळवारी दुरुस्तीची कारणे सांगून संपुर्ण दिवस तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. ग्राहकांकडून वीज बिल वसुली करण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या महावितरण विभागाला सुरळीत वीज पुरवठा ठेवणे मात्र नेहमी अवघड जाते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून करण्यात येणारी कामे अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. जीर्ण झालेले विद्युत खांब, विद्युत तारांजवळ वाढलेली झाडे, उघड्या डीपी यांसारखी इत्यादि कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी महावितरण विभागाची लगबग सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, यामुळे सध्या सुरू असलेला विजेचा लपंडाव पावसाळ्यातही कायम राहिला नाही म्हणजे झाले, अशी अपेक्षा तळा वासीयांकडून व्यक्त केली जात आहे.एकंदरीत पावसाळी पूर्व कामे पूर्ण करणे महावितरण विभागासाठी एकप्रकारे आवाहन असणार आहे. झाडे तोडणे, बॉक्स मेंटनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळी पूर्व कामे महावितरण विभागाकडून पूर्ण केली जातात.