शेकडो महिलांचा रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा
| चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या खटल्याचा माणगाव न्यायालयात 8 मे रोजी निकाल लागला. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरविले. न्यायालयाने दिलेला निर्णय दुदैवी असल्याने रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांचा मंगळवार (दि. 13) रोजी कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महिलांनी विविध मागण्यांचे पत्र प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना देण्यात आले. यावेळी आरोपीला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या अशा घोषणा महिलांनी दिल्या. या मोर्चात सर्व समाज बाधंव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात आला होता. सरकारी बाजु मांडण्यासाठी अॅड. उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. परंतु, माणगाव कोर्टात निकाल दुर्दैवी व अन्यायकारक असल्याने संपूर्ण रोह्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने राम मारुती चौक ते रोहा तहसीलदार असा मोर्चा काढण्यात आला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, या प्रकरणाचे सक्षम यंत्रणेची नव्याने नियुक्ती करुन चौकशी करून पीडितेला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा तर उच्च न्यायालयात प्रकरण चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच प्रकरणात सर्व पुराव्याचा पूर्णत: विचार आला नसल्यास प्रकरणाची पुन्हाची मागणी अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात यावी . या प्रकरणात काही अपुरे पुरावे असल्यास ते पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी व अन्य विशेष सक्षम यंत्रणा स्थापन करावी. सदर तपास योग्य करण्यात आला आहे कि नाही यासाठी विशेष कमिटीची स्थापना करण्यात यावी तसेच या तपास यंत्रणेतील अधिकार्यांची विभागाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सकल मराठ समाजाच्या वतीने दिलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास यापुढे प्रशासना वरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल समाजांचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिला आहे .
प्रशासन म्हणून पीडित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे . तर खटला चालविण्यासाठी चांगले देऊन मुंबई उच्च न्यायालयात खटलाचालवण्यात येईल तसेच आपण दिलेल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी द्वारे शासनापर्यंत पोहचविण्यात येईल.
ज्ञानेश्वर खुटवड,
रोहा प्रांत अधिकारी