सागरी सुरक्षा वार्‍यावर; अधिकारी फक्त नावालाच- पंडीत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्‍वर येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सागरी सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र किनार्‍याची सागरी सुरक्षा वार्‍यावर असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले असून तटरक्षक दलाचे अधिकारी झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल माजी आ. पंडीत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जम्मु काश्मीर, पंजाबमध्ये ज्या प्रमाणे नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे, त्याप्रमाणे सागरी सुरक्षेच्यादृष्टिने नियंत्रण रेषा आखण्याची मागणी त्यावेळी पंडीत पाटील यांनी तत्कालिन सरकारकडे केली होती. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. आता सरकारला जाग आली असून त्यावर चर्चा केली जात आहे, हे दुर्देव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

यापुढे पंडीत पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणेचा अभाव असून संपूर्ण समुद्र किनारी तात्काळ मदत पोहोचविणे कठीण आहे. आजच्या घटनेनंतर संशयित बोट एका महिलेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते खरच अतिरेकी असते तर त्यांना रोखण्यात रायगडची सुरक्षा यंत्रणा अपुरी पडली असती. रायगड जिल्ह्यावरील भीषण संकट टळले असले तरी भविष्यात अशी घटना घडू नये, याकरीता खासदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठविणे गरजेचे आहे.

मुरुडमध्ये तटरक्षक दलाची यंत्रणा आहे. त्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असताना हरिहरेश्‍वरमध्ये बोट येईपर्यंत अधिकारी काय करीत होते? अनुचित प्रकार घडला असता तर त्याला जबाबदार कोण?, असा आक्रमक प्रश्‍न पंडीत पाटील यांनी उपस्थित केला असून जिल्ह्याची सागरी सुरक्षा बळकट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Exit mobile version