तिरंग्यांनी सजला बाजार

झेंड्यांना वाढती मागणी; खादीसह दुपट्टा, टी-शर्ट, बॅण्ड दाखल

| पनवेल | वार्ताहर |

प्रजासत्ताक दिनाला अवघे दोन दिवस उरले असताना पनवेल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर तिरंग्याचे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये झेंड्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच बाजारामध्ये अनेक नवीन वस्तू पाहायला मिळत आहे. यामध्ये खादीसह तिरंगी दुपट्टा, टी-शर्ट, हातातील माळ, टोपी अशा विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल वाढली असल्याचे दिसत आहे.

दरवर्षी बाजारात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात काहींना काही नवीन वस्तू पाहायला मिळतात. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची आतापासून रूपरेषा आखली जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीच्या कपड्यांना अधिक मागणी आहे. त्यातच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वांनी आपापल्या पद्धतीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

मोठमोठे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपली दुकाने तिरंगा, दुपट्टा, माळा, पतंगांनी सजवली आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग वापरून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. लहान मुले तिरंग्याच्या टोप्या, लॉकेट तर मुली सोनेरी तसेच चांदीच्या रंगात रंगलेल्या तिरंग्याच्या बांगड्या खरेदी करताना दिसत आहेत.

याशिवाय तिरंग्याच्या प्लास्टिकच्या टोप्या, मुलींसाठी दुपट्टे, हेअर बॅण्ड, बांगड्या, टी- शर्ट आदींची विक्री केली जात आहे. दुचाकी आणि वाहनांवर झेंडे लावण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे झेंड्यांना यंदा मागणी वाढली आहे. बाजारपेठांमध्ये सर्वत्र तिरंगा झेंडे दिसत आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या आकारातील ब्रोचेस, टोप्या, रिबन इत्यादी तिरंग्याच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. यासोबतच भेटवस्तूंमध्ये तिरंग्याच्या वस्तूंचादेखील समावेश आहे.

Exit mobile version