सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबईतील तळोजा परिसरातील नावडे येथे आणखी एका विवाहितेने सासरकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी होणाऱ्या जाचातून 21 वर्षीय तरुण विवाहितेने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली विनायक पवार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशालीने मंगळवारी (दि.28) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मयत वैशालीचा विवाह 10 मे 2023 रोजी उमेश रमेश पवार याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी वैशालीच्या माहेरच्यांनी सुमारे अडीच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने दिले होते. इतके देऊनही वैशालीच्या सासरच्या मंडळींचा हावरटपणा थांबला नाही. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांनी वैशालीकडे नवीन कार घेण्यासाठी माहेरहून आणखी 1 लाख रुपये आणावेत, अशी मागणी सुरू केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने पती उमेश पवार, सासू अरुणा पवार, सासरा रमेश पवार यांच्यासह नणंद सोनू राठोड, नेहा राठोड आणि मेव्हणा कृष्णा राठोड यांनी वैशालीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सततचा अपमान, जाच आणि छळ यामुळे वैशाली पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचली होती. सासरच्या लोकांकडून होणारा हा अमानुष छळ असह्य झाल्यामुळे अखेर मंगळवारी सकाळी वैशालीने टोकाचे पाऊल उचलले. या धक्कादायक घटनेनंतर वैशालीच्या वडिलांनी तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वैशालीचा पती उमेश पवार, सासरा रमेश पवार आणि सासू अरुणा पवार या तिघांना अटक केली आहे. तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या नणंद सोनू राठोड, नेहा राठोड आणि मेव्हणा कृष्णा राठोड यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. तळोजा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version