| पनवेल | वार्ताहर |
उलवेमध्ये राहणार्या विवाहितेचा अज्ञात मारेकर्याने भररस्त्यात गळा चिरुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उलवे, सेक्टर-5 मध्ये घडली. या घटनेनंतर मारेकरी फरार झाला असून, उलवे पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलवीना पती किशोरसिंग राजपूत याच्यासोबत उलवे, सेक्टर-5 मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती. अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग दोघेही परतत होती. अलवीना सेक्टर-5 मधील मुख्य रस्त्यावर उतरुन 50 मीटर अंतरावर असलेल्या आपल्या घराच्या दिशने पायी चालत जात होती. याचवेळी तिच्या मागावर असलेल्या अज्ञात मारेकर्याने तिला रेडीयन्स स्प्लेंडर बिल्डींगसमोर गाठून तिच्या गळ्यावर धारदार चाकुने वार केले. त्यामुळे अलवीना गंभीर जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी कोसळल्यानंतर मारेकर्याने तेथून पलायन केले. हा प्रकार त्या परिसरातील काही नागरीकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अलवीना या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अलवीनाचा मृतदेह ताब्यात घेतला. अलवीनाची हत्या करणारा आरोपी ओळख पटू नये यासाठी तोंडावर रुमाल बांधून आल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीवरुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.