| पनवेल | वार्ताहर |
खारघर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाने ग्रामस्थ आणि रहिवासी त्रस्त असून, पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
सेक्टर- 10 मधील रंजीत जोगी हे सायकलिंगसाठी गेले असता, कस्तुरी इमारतीसमोरील पदपथावर बसलेल्या एका मोकाट कुत्र्याने जोगी यांच्या डाव्या पायाला चावा घेतल्याने त्यांना दुखापत झाली आहे. सेक्टर 10 परिसरातील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची टोळी बसलेली असते. कुत्र्यांच्या भीतीपोटी लहान मुलांना सोसायटीच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोपरा गाव आणि वसाहत सेक्टर 10 वसविण्यात आली आहे. कोपरा गावातही मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिसरात रात्रीच्या वेळी रस्ते आणि पदपथावर वडापाव, चायनीज अशा खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असतात. रात्री शिल्लक असलेले टाकाऊ पदार्थ तेथेच फेकले जातात. मोकाट कुत्र्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.