| पनवेल | वार्ताहर |
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मदतीचा धागा शोधणार्या खारघरमधील विवाहितेला फेसबुकवरुन झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकद्वारे ओळख झालेल्या सायबर चोरट्याने या विवाहितेला क्रिप्टो करन्सी मध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून तब्बल 78 लाख 82 हजाराची रक्कम उकळून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेली 53 वर्षीय महिला खारघरमध्ये राहण्यास असून, 2020 मध्ये या विवाहितेला जुबेर खान नामक व्यक्तीच्या फेसबुकवर तुम्ही सुध्दा पैसे कमवू शकता, अशा प्रकारची जाहिरात निदर्शनास आली होती. विवाहिता आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी जुबेर खान याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी जुबेर खान याने या विवाहितेला द चॅ म्प कॉईन आणि नंतर बायनान्स अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांना वेगवेगळ्या क्रिफ्टो टोकन्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार या विवाहितेने 3 ऑक्टोबर 2020 ते 25 मार्च 2025 या कालावधीत आपल्या बँक खात्यातून जुबेर खानच्या बँक खात्यात एकूण 78 लाख 82 हजार रुपये पाठवले. त्यापैकी फक्त 3 लाख 51 हजार रुपये जुबेर खान याने परत केले. त्यामुळे या विवाहितेने उर्वरित रक्कम परत मागितली असता, त्याने आणखी 26 लाख 70 हजार रुपये भरल्याशिवाय पैसे परत मिळणार नाहीत, अशी धमकी दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या विवाहितेने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.