। रोहा । प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील दुर्गम जंगल भागात यापूर्वी गुरे चोरीला जाण्याच्या घटना अधूनमधून होत होत्या. पण, गेल्या काही दिवसांत गुरे चोरी होण्याबरोबरच गोवंशाची सर्रास हत्या होत असल्याचे दिसून येत असल्याने रोहा पोलिसांसमोर गोवंशाची हत्या करणार्या लोकांनी फार मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहपूर्वी गुरे चोरीला जात असत; पण सध्या या व्यवसायात सक्रीय असणार्या लोकांनी सर्रास गोवंशाची हत्या करून मांस नेण्यास सुरुवात केल्याने स्थानिक शेतकरी व पशुपालक यांच्यामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यात काही दिवसांपूर्वी गुरे चोरणार्या एका टोळीला वराठी भागात स्थानिक नागरिकांनी पकडून दिले होते. तरीदेखील गोवंश हत्या व चोरी या प्रकाराला आळा बसलेला नाही. रात्रीच्या अंधारात हे प्रकार तालुक्यातील सर्व भागात होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कुंभोशी, धोंडखार, भालगाव, तांबडी, वराठी या ठिकाणी गोवंश चोरी व हत्या झाल्याचे दिसून आले आहे. खरीप हंगामात गोवंशाची शेतकरी वर्गाला मोठी मदत होते. तसेच अनेक शेतकरी बांधवांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी व म्हशी पाळून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. पण, गुरांची होत असलेली चोरी व हत्या यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक गावांत स्थानिकांनी या गुरे चोरून हत्या करणार्या लोकांना पकडण्यासाठी जागता पहारा सुरू केला आहे. माणगाव तालुक्यातदेखील अशाच एका टोळीला स्थानिकांनी पकडून मारहाण केली. पण, या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनाच तुरुंगात बसण्याची वेळ आली आहे. म्हणून नागरिकांनी सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे.
रोहा तालुक्यात सर्रास गोवंश हत्या; पोलिसांसमोर आव्हान
