आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

| पोलादपूर | प्रतिनिधी |

आंबा बागायतदार शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षांपासून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने रडवले आहे. नुकतेच शनिवारी आलेल्या अवकाळीने पोलादपूर तालुक्यात काढणीला आलेल्या आंबा पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंबा पीक जलकुंडातून पाणी पुरवठा देऊन जगविलेल होते. परंतु, अवकाळीमुळे आंबा पीक पडून झाडावरून खाली आपटल्याने पिकण्यापूर्वीच नासण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या 5-7 वर्षांपासून तालुक्यातील कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, दाभिळ, रानवडी, देवपूर, कापडे, गोळेगणी, पळचिल, तळयाची वाडी, बोरावळे, घागरकोंड तसेच सवाद, कालवली आणि अन्य भागातील शेतकऱ्यांनी आंबा बागायती शेती करण्यास सुरूवात केली आहे. या बागायती शेतीसाठी आंब्याच्या रोपांना पाणीपुरवठा कमी पडू नये म्हणून जलकुंडांची योजना शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतांमध्ये केली आहे. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या पहिन्या पंधरवड्यात तब्बल दोन ते तीन वेळा वादळी अवकाळी पाऊस पडल्याने आंब्याचे पिक झाडावरून तूटून जमिनीवर आपटल्याने पिकविण्यासाठी आढीत ठेवल्यानंतर नासण्याचे प्रमाण वाढले आहे.

Exit mobile version