| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी घडली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पंचतारांकीत हॉटेलला आग लागल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील फेअरमोंट हॉटेल्स या पंचतारांकीत हॉटेलला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहार पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. आगी वर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलच्या किचनमधून धूर आल्याचे काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. फेअरमोंट हॉटेल्सच्या टेरेसवरील एसी कंप्रेसर फुटल्यामुळे आग लागली. आगीने काही वेळातच हॉटेलच्या इतर भागातही वेगाने पसरली. जेडब्ल्यू मॅरिएटच्या शेजारील हे हॉटेल आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. घटना घडताच हॉटेलमधील व्यक्तींना बाहेर काढले आहे. नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.