| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी (दि.11) सकाळच्या 11.30 वा. च्यासुमारास घडली आहे.
अंधेरी पश्चिमेतील असलेल्या ओशिवारा येथे एक मोठं फर्निचर मार्केट आहे. येथे फर्निचरची मोठ मोठी दुकानं आणि लाकडी गोडाऊन देखील आहेत. या फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली आहे. लाकडांचे गोडाऊन आणि फर्निचरचं सामान असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरली आहे. आगीने सध्या रौद्र रुप घेतलं आहे. आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जवळपास 12 अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग 150 हून अधिक लाकडी फर्निचरच्या दुकानांमध्ये पसरली आहे. सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. लाकडी गोडाऊन आणि फर्निचर मार्केट असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि ती वाढत चालली आहे. दुकानं जळून खाक होत आहे. आतापर्यंत सात ते आठ सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सध्या या परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. आग लागताच फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगारांन दुकानाबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या आगीमध्ये फर्निचर मार्केटमधील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.