। अलिबाग । कृषीवल टीम ।
अलिबाग-पेण मार्गावरील तिनविरा धरणाजवळील दरोडा प्रकरणाला एक वेगळ वळण येऊ लागले आहे. या प्रकरणात आमदारांचं कनेक्शन असल्याची चर्चा सध्या जोरात रंगत आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह दोन पोलीस कर्मचारी आमदारांच्या बंगल्यावर कर्तव्य बजावत होते. यातील दोघेजण अंगरक्षक, दोघे किरकोळ काम करणारे कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
विकी साबळे या पोलीस कर्मचार्याची नियुक्ती अलिबाग पोलीस मुख्यालयात होती. तो आमदाराच्या बंगल्यावर अंगरक्षक म्हणून सेवा करीत होता. तसेच समीर म्हात्रे या पोलीस हवालदाराची नियुक्ती मुरूड पोलीस ठाण्यात होती. तोदेखील आमदारांच्या बंगल्यावर अंगरक्षक म्हणून काम पाहत होता. तसेच समाधान पिंजारी हा मुख्य आरोपी आमदाराच्या बंगल्यावर कामगार म्हणून होता. आमदारांना भेटण्यास येणार्यांना चहा देण्यापासून काही किरकोळ कामे तो करीत होता. याशिवाय दिप गायकवाड हा आरोपीदेखील आमदारांच्या बंगल्यावर देखभाल दुरुस्तीचे काम करीत होता. हे चौघेही आमदारांच्या बंगल्यावर काम करीत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्यांचा प्लॅन आखला गेल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. अशातच आमदारांचे अंगरक्षक आमदारांसोबतचे कर्तव्य सोडून तिनविरा येथे कसे गेले? थांबलेल्या चारचाकीमधील मंडळींची विचारणा करण्याचा त्यांच्यामागचा उद्देश काय होता, असे अनेक प्रश्न जनमानसात निर्माण झाले असून डिझेल तस्करांसोबतच्या कनेक्शननंतर दरोडाप्रकरणातील आरोपींसोबत असलेल्या संबंधांमुळे आमदारांच्या कार्यपद्धतीवरदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एसपी गप्प का?
गेल्या काही दिवसांपासून डिझेल तस्करीच्या प्रकरणावरून पोलीस चर्चेत येत असताना आता दरोडाप्रकरणातही पोलीस चर्चेत येऊ लागले आहेत. ही घटना घडून दोन दिवस उलटून गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अद्यापही यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे ते अजूनपर्यंत गप्प का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.