। अलिबाग । वार्ताहर ।
आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम, थळ ही आरसीएफ थळमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांची संस्था आहे. संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मदत केली जाते. संस्थेचे सुमारे 980 सभासद आहेत. 2015 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला आता दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत.
संस्थेतर्फे दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत असते. यावर्षीचे स्नेहसंमेलन आरसीएफ कम्युनिटी हॉल, कुरूळ, अलिबाग येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुदगेरीकर हे होते. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून गोस्वामी डायरेक्टर टेक्निकल तसेच शेख डायरेक्टर फायनान्स व निरंजन सोनक डायरेक्टर मार्केटिंग हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे 600 सभासद पती-पत्नी हजर होते. सुरुवातीला सभासदांचे नाव नोंदणी तसेच तिळगुळ व महिलांना गजरे व दवणा देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्याआधी फोरमचे सभासद शशिकांत म्हात्रे व त्यांचे सहकारी यांनी सुंदर भजन सादर करून उपस्थितांचे मन भक्तीभावाने भरून टाकल.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून मंगेश भगत यांनी बासरीवर वाजवलेल्या ओम नमः शिवाय या गीताने झाली. त्यानंतर वर्षभरात दिवंगत झालेल्या नामवंत व कीर्तीवंत व्यक्तीं व फोरमचे दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोरमचे अध्यक्ष रवींद्र वर्तक यांनी सुरुवातीस प्रास्ताविक केल. फोरमच्यावतीने करण्यात येत असलेली विविध कामे, उपक्रम यांचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यपालक निर्देशक, थळ नितीन हिरडे यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्त कर्मचार्यांनी घातलेल्या पायावरच आम्ही पुढे जात आहोत असे सांगून सेवानिवृत्त कर्मचार्यांनी कंपनीस दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले. आपल्या सर्वांची कंपनी अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच नवीन नवीन संयंत्र सुद्धा उभारली जात आहेत, असे सांगितले. त्यानंतर मुदगेरीकर यांनी आपले भाषणात सेवानिवृत्त कर्मचार्यांनी कंपनीच्या स्थापनेपासून दिलेल्या सहभागाबद्दल आवर्जून उल्लेख केला. सेवानिवृत्त कर्मचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कंपनीला वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचार्यांची फोरमकरीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अशा संस्थेची कशी गरज आहे, हे सुद्धा प्रतिपादन केले. सेवानिवृत्तीनंतर वेळोवेळी एकत्र येऊन आपल्या समस्या अनुभव यांची देवाणघेवाण करणे ही एक मानसिक गरज असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. मुदगिरीकर यांनी आश्वासन दिले की फोरमला व्यवस्थापन यापुढे सुद्धा असेच सहकार्य करील.
यानंतर संमेलनाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर खुसखुशीत विनोदी शैलीने मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. ज्येष्ठ नागरिकांनी जीवनात सेवानिवृत्तीनंतर कसे वागावे व थोडे अलिप्तपणे जीवन जगून आनंदी कसे राहावे याबद्दल त्यांनी काही सूचना केल्या.