जयंत पाटील करणार कार्यकर्त्यांना संबोधित
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्याचा समारोप मंगळवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असून, उपस्थित कार्यकर्त्यांना जयंत पाटील संबोधित करणार आहेत.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सुरेश खैरे यांच्या जिल्हा चिटणीस निवडीनंतर रायगड जिल्ह्यात शेकापचा दौरा सुरु करण्यात आला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात संवाद मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. शनिवारपासून (दि. 8) या संवाद मेळाव्याला उरण व पनवेल येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रविवारी (दि.9) पेण, सुधागड-पाली, रोहा, मुरूड येथे मेळावा भरविण्यात आला. सोमवारी (दि.10) पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, माणगावमध्ये मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण व महिला कार्यकर्ते या मेळाव्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन पक्षाची भूमिका ऐकून घेत आहेत. या मेळाव्यातून एक वेगळी ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाली आहे. शेकापच्या संवाद मेळाव्याचा समारोप मंगळवारी (दि. 11) अलिबागमध्ये होणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह येथे हा मेळावा सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.