। म्हसळा । महेश पवार ।
शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरिबांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, गद्दार हे नेहमी गद्दार असतात, ते पक्षासोबत कधी काम करू शकत नाही. मात्र, शेकापक्ष हा कामगारांचा पक्ष आहे, तो केव्हाही संपणार नाही, तो समोरच्याला संपवेल, असा इशारा सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. संवाद दौऱ्यानिमित्त म्हसळा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक कुणबी समाज हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील भौगोलिक रचनेचा विकासाचा पाढा वाचताना सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आपला एक नंबरचा शत्रूपक्ष भाजप आहे. तो भांडवलदारांचा पक्ष आहे. गरिबांचा नाही. गरिबांसाठी लढणारा पक्ष हा केवळ शेतकरी कामगार पक्ष आहे. काही काळामध्ये पक्षाला अपयश आले असले तरी आपण कोणी खचलो नाही आणि खचून जाणार नाही. उलट जोमाने काम करण्याची तयारी मीदेखील ठेवलेली असून, तुम्हीदेखील ठेवा. जरी मी 70 वर्षांचा असलो तरी पक्षासाठी पन्नास वर्षांच्या उमेदीचे काम करण्याचे मानस तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात काम करता करता समाजाच्या कार्यासोबत शैक्षणिक कार्यात रायगड जिल्ह्यामध्ये अग्रेसर काम केले आहे. ज्या खेडेगावात शिक्षणाकरिता शाळा नाहीत, त्या खेडेगावात कोणी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी जयंत पाटील पोहोचला आहे. शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी उच्च शिक्षित घडायला हवा आहे या उदात्त हेतूने मी या ग्रामीण भागात माझ्या उत्पन्नातील काही वाटा बाजूला काढून शेकडो शाळा आज स्थापन केल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. ज्याप्रमाणे माझा नातू चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊ शकतो, त्याचप्रमाणे या गोरगरीब शेतकऱ्याचा मुलाला शिक्षण घेता आले पाहिजे, हा हेतू मी समोर ठेवला आहे. ग्रामीण प्रत्येक खेडेगावात इंग्लिश मीडियमची शाळा काढण्याचादेखील माझा मानस आहे.
पक्षाची जडणघडण करताना कोणाला दुखवू नये, प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्याला सोन्यासारखा आहे, जी कामे होणार नाहीत, ती माझ्यापर्यंत पोहोचवा, पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
संवाद दौऱ्यासाठी सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, ॲड. अतुल म्हात्रे राज्य खजिनदार, प्रदीप नाईक, राज्य महिला आगाडी अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस संतोष पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे, माजी सरपंच राजाराम धुमाळ, माजी तालुका चिरणीस परशुराम मांदाडकर, गौरीताई पयेर, किसन पवार, सूर्यकांत तांबे, विभागीय चिटणीस जितेंद्र गीजे, अन्वर हजवाने, वसिम कोदरे, अनंत मेंदडकर, महादेव म्हात्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.