| सोलापूर | प्रतिनिधी |
सोलापूरमधील अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात आग लागली. यात तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्या लोकांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आले, ते देखील मृत अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचा मुलगा, त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. संध्याकाळी आग पुन्हा धुमसल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक आगीत अडकल्याने त्यांना शोधण्यासाठीची मोहीम पहाटेपासून सुरु होती. सर्वजण मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आले नाही. श्वास गुदमरुन आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. आगीमध्ये 5 पुरुष, 2 महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आपलं बाळं आगीतून वाचावं म्हणून आईने 1 वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतले होते. पण, काळ बनून आलेल्या आगीत चिमकुल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मंसूरी (87), अनस मंसूरी (24), शीफा मंसूरी (22), युसुफ मंसूरी वय 1 वर्ष, आयेशा बागवान (38), मेहताब बागवान (51), हिना बागवान (35), सलमान बागवान (38)असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. आग विझवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडल्याचा आरोप केला जात आहे. आग विझवण्यासाठी पाणी कमी पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन खासगी टँकरनी पाणी मागवून घेण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काहीतासांमध्ये आग पुन्हा धुमसली. अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.