200हून अधिक झाडांची होणार लागवड
। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील कळबंस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जागेत लोकसहभागातून देवराई उभी राहणार आहे. या देवराईत विविध प्रकारची देशी प्रजातीची 200 हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होताच रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतला आहे. विविध खासगी कंपन्या, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे, तसेच दानशूरांच्या लोकसहभागातून तालुक्यात प्रथमच ही देवराई होत आहे.
पर्यावरणाची आवड असलेल्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे हे देवराई उभारण्यासाठी गेल्या काही दिवसापासून कामाला लागले आहे. कळबंस्ते येथे पशुसंवर्धन विभागाची साडेतीन एकर जागा कित्येक वर्षे पडीक होती. रेल्वे फाटक आणि चिपळूण धामनंद या मुख्य रस्त्यालगत ही जागा आहे. जिल्हाधिकार्यांनी येथे देवराई उभारण्यास मान्यताही दिली आहे. गेल्या चार पाच दिवसात या जागेचे सपाटीकरण करण्यात आले. त्यानंतर आता झाडांच्या सुरक्षिततेसाठी जमिनीच्या चारही बाजूस तारेचे कंपाऊंड घालण्यात येणार आहे. दोन झाडांमध्ये सुमारे 15 ते 20 फुटाचे अंतर सोडून त्याची नियोजनबद्ध लागवड करण्याचे नियोजन आहे. झाडांना नियमीत पाणी मिळण्यासाठी येथे ठिबक सिंचनाची व्यवस्था केली जाणार आहे. नदिकिनारीच ही जागा असल्याने येथे पाण्याची कसलीच कमरता नाही. जिल्ह्यातील विविध नर्सरीतून देशी प्रजातीची रोपे घेतली जाणार आहेत. तसेच अपेक्षीत रोपे न मिळाल्यास ती पुण्याततील देवराई तून घेण्याचे नियोजन आहे. पुढील कालावधीत या प्रकल्पाची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे आदी विविध बाबींची जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेवर सोपवण्यात आली आहे.
पर्यावरण प्रेमी भाऊ काटदरे यांच्यासह तहसीलदार प्रविण लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी, महसूलचे अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी, पंचायत समिती, लोटे एमआयडीसीतील विविध कंपन्या, क्रिडाई, आदी विविध सेवाभावी संस्था, तसेच विविध शासकीय कार्यालये आदींचा लोकसहभाग घेतला जात आहे.
फलक, क्युआर कोडद्वारे झाडांची माहिती
सुमारे 200 हून अधिक देशी प्रजातीची झाडे येथे लावली जातील. झाडांची माहिती देणारे फलक व अधिक माहितीसाठी त्याचा क्युआर कोड दोन्ही झाडांच्या मध्यभागीच लावण्यात येणार आहे. जेणेकरून मुलांना विविध प्रकारच्या झाडांची माहिती मिळू शकेल.
चिपळूण परिसराच्या वैभवात भर
ही देवराई पुढील काळात देखील योग्य रितीने बहरण्यासाठी सुरवातीपासूनच त्याची दखल घेतली जात आहे. आगामी काळात येथील हिरवीगार देवराई चिपळूण परिसराच्या वैभवात भर टाकेल, असा विश्वास या प्रकल्पासाठी मेहनत घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि संस्था व्यक्त करत आहेत.