। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे वसाहतीतील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा या निवासी इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेत आई व मुलीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. पहिल्यांदा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, नंतर आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. याच दरम्यान दोन वेळा जोरदार स्फोटांचे आवाज आल्याचे साक्षीदारांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार हे स्फोट सिलेंडरचे होते. आगीमुळे काही सेकंदांतच संपूर्ण घर धुराने आणि ज्वाळांनी वेढले गेले. घटनेनंतर रहिवाशांनी तातडीने पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, फ्लॅटमध्ये असलेल्या रेखा शिसोदिया व पायल शिसोदिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघींचा मृतदेह आगीच्या लपेटात सापडला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग सिलेंडर स्फोटामुळे आणखी भीषण बनली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. अधिकृत कारण लवकरच समोर येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, अग्निशमन दलाने शॉर्टसर्किट आणि गॅस सिलेंडर सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळीच्या आनंदावर काळोख
ही दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात दिवाळी सणाचा उत्साह होता. घराघरांत दिवे, फटाके आणि आनंदाचे वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या या भीषण घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली. नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी भीती आणि हळहळ स्पष्ट दिसत होती. स्थानिकांनी सांगितले की, आग लागल्याचे लक्षात येताच आम्ही धावत बाहेर आलो. काही क्षणातच संपूर्ण मजला धुराने भरला होता. अग्निशमन दल आले नसते, तर कदाचित संपूर्ण इमारत जळाली असती.
अग्निशमन दलाचा अहवाल आणि पुढील तपास
अग्निशमन दलाने आग विझवून घरातील पाहणी केली आहे. प्राथमिक अहवालानुसार, सिलिंडर लिकेज आणि स्पार्कमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र नेमके कारण समजण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. कामोठे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांची ओळख पटली असून, दोघी आई-मुलगी असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.






