कळंबोलीत लवकरच माता-बाल रुग्णालय

पनवेल पालिकेचा निर्णय; शंभर कोटी रुपयांचा खर्च
। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असणार्‍या पनवेल पालिकेला सिडकोने कळंबोली येथे जाहीर केलेल्या तीन एकर भूखंडावर पालिका अद्ययावत माता बाल संगोपन रुग्णालय उभारणार आहे. यासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. कोरोना काळात पालिकेला खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागले होते. माता-बाल संगोपन रुग्णालयाच्या माध्यमातून पालिकेची आरोग्य यंत्रणा उभी राहात असून पनवेलकरांना त्याचा फायदा होणार आहे.


पनवेल महापालिकेच्या मागणीनुसार सिडकोने सेक्टर चारमध्ये रुग्णालयासाठी 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अदा केला आहे. अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पालिकेची स्वतंत्र अशी आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महासाथीच्या काळात पालिकेला काही खासगी रुग्णालये भाडयाने घेऊन नागरिकांवर उपचार करावे लागले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा अतिशय तुटपुंज्या आहेत. त्यामुळे पनवेलमधील अनेक करोनाबाधित रुग्ण हे नवी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून होते. भविष्यातील आर्थिक केंद्र असणार्‍या पनवेल क्षेत्रातील महापौर निवासस्थान चांगल्या दर्जाचे असावे यासाठी या बांधकामावर 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. पनवेल पालिकेची आर्थिक स्थिती तशी नाजूक असल्याने येथील खर्चाला मर्यादा आहेत. मात्र पालिकेने अवास्तव खर्च कमी करून 160 कोटी रुपयांचा निधी ठेवी स्वरूपात ठेवण्याची किमया या काळात केली आहे. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देताना पालिकेने 103 कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत माता-बाल संगोपन रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version