अश्वमालकाला आर्थिक भुर्दंड
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असून, शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे मारले होते. त्यात बनवलेले चेंबर हे घोड्यांसाठी धोकादायक बनले आहे. पर्यटन हंगाम सुरू होत असताना एका अश्वमालकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
माथेरानमध्ये सध्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु, हे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अनेक वेळा माथेरान शहरातील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, हे काम करणारा ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आलेला आहे. आज तर या कामांकरता उभारण्यात आलेल्या चेंबरच्या झाकणावरून घोडा जात असताना त्याच्या पाय झाकण तुटल्याने चेंबरमध्ये अडकला सुदैवाने घोडा व त्यावरील प्रवासी थोडक्यात बचावले. परंतु, यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत असून, मलनिस्सारण प्रकल्प वाद विकोपाला गेला आहे. माथेरानच्या विविध भागांमध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे काम घाई गडबडीमध्ये उरकण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना खोदलेल्या खड्ड्यामध्ये कोणतीही प्रकारची सोलिंग करण्यात आलेली नाही. तर पाणी वाहून जाण्याकरता उतार असावा असा नियम असताना अनेक ठिकाणी घाईगडबडीमध्ये पाईपलाईन टाकल्या गेले आहे.
माथेरानमधील पालिका प्रशासनाने ही दुर्लक्ष केल्याने रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. माथेरानमधील अश्वचालक नागेश परेरा यांचा घोडा प्रवाशाला पाठीवर बसून घेऊन जात असताना अचानक घोड्याचा पाय या चेंबरच्या झाकणावरून थेट आतमध्ये गेला. त्यामुळे घोड्यासकट प्रवासी जमिनीवर आपटले सुदैवाने प्रवाशास कोणती इजा झाली नसली तरी घोड्याच्या पायास दुखापत झाली आहे. तातडीने मदत मिळाल्यामुळे या चेंबरमधून घोड्याचा पाय काढण्यात यश आले. या अपघातामुळे या प्रकल्पाच्या चेंबरवर लावण्यात आलेल्या निकृष्ट झाकणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. वारंवार या प्रकल्पा प्रकल्पाबाबत तक्रारी होत असतानाही पालिका अधिकारी ठेकेदाराबाबत आपले भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही. त्यामुळेच हा ठेकेदार कोणालाही ना जुमानता कारवाई व्हावी अशी मागणी अश्वचालकांकडून होत आहे.
