। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या दाम्पत्याची कार दस्तुरी नाका येथील वाहतूक कोंडीत अडकली. त्यावेळी कारच्या मागे असलेल्या दुचाकी जवळ त्यांची कार जावून चिकटली. त्याचा राग आल्याने दुचाकी चालकाने कार चालकावर चाकूने हल्ला केला. दरम्यान चाकू हल्ल्यात जखमी झालेला पर्यटक प्रवासी अंबरनाथ येथील असून या प्रकरणी माथेरान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरातील मोरीवली येथील जितेश अनंत कदम हे आपल्या पत्नीसह कारने (कार क्र. एम.एच.05 ईल 3028) माथेरान येथे फिरण्याकरीता आले होते. त्यांची गाडी दस्तुरी येथे झालेल्या वाहतुक कोंडीने हळूहळू पुढे जात होती. त्यावेळी जितेश कदम यांची कार मागे जाऊन पाठीमागे असलेल्या मोटारसायकलला लागली. त्यामुळे संतापलेल्या दुचाकी चालक तेजस अंकुर गायकर याने आपल्या साथीदार विकी साळवी याच्यासोबत कार चालक कदम यांना शिवीगाळी करीत दमदाटी व हाताबुक्यांनी मारहाण केली. विकी हरीचंद्र साळवी याने कदम यांना मारण्याकरीता चाकुसारखे हत्यार काढुन कार कार चालकावर हल्ला केला.
याबाबत माथेरान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तेजेस अंकुर गायकर आणि विकी साळवी यांच्यावर रायगड जिल्हा दंडाधिकारी यांचे जमाव बंदी आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तेजस गायकर यास ताब्यात घेतले असून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ केतन सांगळे हे करीत आहेत.