। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडयातील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावातील अनेक ऐतिहासिक वास्तू पोर्तुगिज काळाची साक्ष देत आहेत. त्याचप्रमाणे रेवदंड्यातील माय दे देऊस हे चर्च सुद्धा या काळाचे साक्षीदार असून या मंदिरात ख्रिस्ती बांधव श्रध्दा व भक्तीने विविध उत्सव साजरे करत असतात. प्रतिवर्षी 5 मे रोजी रेवदंड्यातील या चर्चमध्ये ‘माय दे देऊस’ उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.
रेवदंडा गोळा स्टॉप नजीकच असलेले माय दे देऊस चर्च ख्रिस्ती बांधवासह सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. चर्चला पत्राचे छप्पर असून कार्यक्रमासाठी उजव्या बाजूला मोकळी जागा असून तेथेच छोटेखानी व्यासपिठ आहे. समोरील बाजूला विहीर असून ही नवसाला पावणारी तसेच चमत्कार घडविणारी माऊली आहे, असे सांगितले जाते. चर्चमधील देवीच्या वास्तव्याने परिसरात रोगराई कधीच येत नाही, अशी भक्तांची श्रध्दा आहे. वसई, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणांहून भक्त मंडळी, विशेषतः ख्रिस्ती बांधव देवीच्या दर्शनासाठी माय दे देऊस चर्चमध्ये येत असतात.
या चर्चमध्ये 5 मेच्या उत्सवापुर्वी नऊ दिवस अगोदर ख्रिस्ती बांधव सायकांळी प्रार्थना करत असतात. तसेच, हे नऊ दिवस कोर्लई येथील ख्रिस्ती बांधव कोर्लई ते रेवदंडा पायी चालत येत असतात. या उत्सवा निमित्ताने सकाळी ख्रिस्ती बांधव रेवदंडा गावातून पालखी सोहळ्याचे आयोजन करतात. या देवीच्या पालखीला हिंदु धर्मिय श्रीफळ अर्पण करून देवीचे दर्शन घेतात. कोर्लई गावात रोगराई येऊ नये तसेच पीक उत्तम येऊन सुखशांती लाभावी यासाठी या देवीची पालखी फिरविण्यात येते.