मयूर वनगेचे मारेकरी मोकाट

| पेण | प्रतिनिधी |

पेणमधील उद्योजक मयूर वनगे यांना मारहाण झालेल्या घटनेला तीन महिने उलटून गेले असतानाही या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, मंगेश दळवी आणि रूपेश दळवी यांनी दाखल केलेले जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.

मयूर वनगे यांना दि.1 ऑगस्ट रोजी मंगेश दळवी, हरेश दळवी, रूपेश दळवी आणि रंजीत दळवी या चौघांनी सामूहिकरीत्या मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी रंजीत दळवी याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे, तर हरेश दळवी याचा जामीन अर्ज यापूर्वीच जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मंगेश रघुनाथ दळवी आणि रूपेश कृष्णा दळवी यांनीही जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे, घटना घडून तीन महिने उलटले तरी मंगेश दळवी आणि रूपेश दळवी हे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नसल्याची बाब समोर येत आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हाती का लागत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील आरोपी मंगेश दळवी हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याने या प्रकरणाला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाबाबत आणि आरोपींच्या अटकेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. आता पोलीस प्रशासन या आरोपींचा शोध घेऊन त्यांना कधी ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version