| पनवेल | प्रतिनिधी |
उलवे परिसरात एमडीएमए या अमली पदार्थांच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. सुमीत गोपाळ राठोड (25) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या 50 एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील इतर तीन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
उलवे सेक्टर 18 येथे अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा लावला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सुमीत राठोड याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेल्या 50 एमडीएमए गोळ्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले, या कारवाईप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






