जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक खुलासा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या सीएसआर खर्चामध्ये जिल्हा रूग्णालयासाठी दिलेल्या 2 कोटी 6 लाख रुपयांच्या सीएसआर निधी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कंपनीने आपल्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदीवर 1 कोटी 31 लाख 9 हजार रुपये खर्च केल्याचा मोठा दावा केला आहे. तसेच, 2020-21 मध्ये वैद्यकीय उपकरणे पुरविण्यासाठी 75 लाख रुपये दिल्याचाही उल्लेख आहे.
मात्र, माहिती अधिकार कार्यकर्ता संजय सावंत यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीत जिल्हा रुग्णालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, आरसीएफकडून कोणतीही वैद्यकीय उपकरणे किंवा निधी प्राप्त झालेला नाही. आरसीएफ कंपनीचा अधिकृत दावा आणि जिल्हा रुग्णालयाचे लेखी उत्तर, यातील ही गंभीर विसंगती आता मोठ्या घोटाळ्याकडे बोट दाखवित असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
संजय सावंत यांनी आरसीएफ कंपनीच्या 45 व्या अधिकृत वार्षिक अहवालाचा 2022-23 अहवाला दिला आहे. या अहवालातील पृष्ठ क्रमांक 31 आणि 32 वर अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयासाठी वैदयकीय उपकरणे पुरविणे या प्रकल्पाखाली कंपनीने 1 कोटी 31 लाख रुपये इतका खर्च दाखवला आहे. तसेच, 2020-21 मध्ये वैद्यकीय उपकरणे पुरविण्यासाठी 75 लाख रुपये दिल्याचाही उल्लेख आहे. अशा प्रकारे 2 कोटी 6 लाख रूपये आरसीएफ कंपनीने जिल्हा रूग्णालयास दिले असल्याचा त्यांच्या सीएसआर अहवाल दर्शवित कंपनीने हा खर्च थेट केल्याचे नमूद केले आहे. संजय सावंत यांनी 20 डिसेंबर 2025 रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडे आरटीआय अर्ज दाखल केला होता. त्यांनी सन 2017-18 ते सन 2023 ते मार्च 2024 या कालावधीत आरसीएफच्या सीएसआर निधीतून कोणती उपकरणे दिली, त्यांची सध्याची स्थिती, किती उपकरणे नादुरुस्त आहेत, दुरुस्ती झाली का, आणि उपकरणे पुरवठादार कोण आहे, याबाबत माहिती मागवली होती. या अर्जावर 16 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयाचे जनमाहिती अधिकारी डॉ. प्रवीण केंदाडे यांनी लेखी उत्तर दिले आहे. रुग्णालयाने स्पष्ट केले की, सावंत यांनी जी माहिती मागविली आहे ती निरंक माहिती आहे. म्हणजेच, आरसीएफकडून एकही उपकरण किंवा निधी आलेले नाही. रुग्णालयाने ही बाब लेखी उत्तरात नमूद केल्याने आरसीएफचा 2 कोटी 6 लाख रुपये खर्च केल्याचा दावा धुळीस मिळाला आहे, अशी टिका सावंत यांनी केली आहे.
ही विसंगती अत्यंत गंभीर आहे. आरसीएफ ही केंद्र सरकारची कंपनी असून त्यांचा सीएसआर निधी जनतेचा पैसा आहे. कंपनीने अहवालात खर्च दाखवला, परंतु रुग्णालयात प्रत्यक्षात काहीच पोहोचले नाही तर हा निधी कुठे गेला? उपकरणे पुरवठादार कोण? दुरुस्ती झाली का? याबाबत कंपनीच्या प्रतिनीधीकडे विचारणा केली असता जनसपंर्क अधिकारी राकेश कवळे यांनी आरसीएफने जे साहित्य सीएसआरव्दारे विविध संस्थांना पुरविले आहे त्यांचे अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत, असे स्पष्टीकरण दिले. कंपनी आणि जिल्हा रुग्णालय यांच्या माहितीत विसंगती असल्यामुळे या प्रकरणाची सीबीआय, सीएजी तसेच राज्य शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.







