रायगड जिल्ह्यातच नव्हे तर, महाराष्ट्रातील तमाम महिलांना ज्यांचा सार्थ अभिमान आहे, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, दातृत्वाने, वक्तृत्वाने आणि ममत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला, अशा आमच्या लाडक्या भगिनी, आमच्या ताई मीनाक्षी पाटील यांचा 75 वा वाढदिवस साजरा करताना मनोमन अतिशय आनंद होत आहे आणि हा सुवर्ण दिन साजरा करताना रायगडवासियांच्या हृदयात आनंदाची स्पंदने निर्माण झाली नाही तर नवलच. आज मीनाक्षीताईंविषयी प्रत्येकाच्या मनात आदराची, प्रेमाची आपलेपणाची भावना निर्माण झालेली आहे. हीच त्यांची खरी कमाई, संपत्ती आहे. 13 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील भडवळ या खेडेगावात स्व. सुलभाकाकू आणि स्व. प्रभाकर पाटील यांच्यापोटी कन्यारत्नाचा जन्म झाला आणि घर आनंदाने भरून गेले. सुसंस्कृत, आचार-विचार, घरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वातावरणात तिसर्या पिढीच्या शिलेदार म्हणून मीनाक्षीताईंनी पाटील घराण्यात प्रवेश केला आणि पुढे पाटील कुटुंबाला वाईटावर विजय मिळविणारी रणरागिणी उदयास आली.
13 तारखेचे त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्म तेरा तारखेला, राजकारणात प्रवेश 13 व्या वर्षी, 1995 मध्ये विधानसभा निवडणूक झाली तीही 13 तारखेलाच आणि त्यांनी प्रचंड मतांनी निवडून येत विक्रम केला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर स्वतःच्या गुणवत्तेवर राज्यमंत्रीही झाल्या. स्व. भाऊंनी खेडोपाड्यात पोहोचविलेली विकासाची गंगा पुढे नेण्याचे काम अतिशय तळमळीने, नेटाने आणि प्रामाणिकपणे केलेले आहे. त्या एक समाजसेवेने झपाटलेल्या झंझावात आहेत. कोणतेही काम असो, त्या कामात पूर्णपणे झोकून देण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. या स्वभावाने त्यांना कधीच स्वस्थ बसू दिले नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या क्रांतीच्या लाल झेंड्याखाली त्यांनी समाजसेवेची शपथ घेतली. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असा विश्वास त्यांनी आपल्या कार्याने जनता-जनार्दनाला दिला. म्हणूनच त्या अल्पावधीत सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या.
राजकारणाचा श्रीगणेशा करताना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्या स.का. पाटील यांना 13 वर्षांच्या मीनाक्षीताईंनी त्यांना बांगड्या घातल्या. केवढे मोठे हे धैर्य. स्व. भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी आपले कार्य सुरू केले. 1976 साली त्या जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष झाल्या. बिहार वृत्तपत्र विधेयकाच्या विरोधी आंदोलनात भाग घेतल्याने त्यांनी पाच दिवसांचा कारावासही भोगलेला आहे. हे केवळ सामान्यांच्या हक्कासाठी उचललेले यशस्वी पाऊल होते. 22 मार्च 1995 रोजी आमदारकीची शपथ घेताना लाल बहाद्दूर शास्त्रींचे घोषवाक्य ‘जय जवान, जय किसान’ उच्चारून आपण कोणाचे प्रतिनिधीत्व करत आहोत हे त्यांनी संपूर्ण सभागृहाला दाखवून दिले. 3 एप्रिल 1995 रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील पहिले-वहिले अभ्यासपूर्ण आणि ठोस आत्मविश्वासाने भरलेले भाषण करून लोकप्रतिनिधी कसा असावा हे सभागृहाला दाखवून दिले. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्याभोवती त्यांच्यासमवेतच राहून कामाचा हिमालय उभा करणार्या मीनाक्षीताई या पहिल्या फळीच्या कार्यकर्त्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचपासून ते महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षम राज्यमंत्री होण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकला नाही. हे नारीशक्तीचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. ज्या उमेदीने राज्यमंत्रीपद स्वीकारले, त्याच उमेदीने सोडलेही. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा आपले वडील स्व. भाऊंचा बाणा पूर्णपणे अंमलात आणला.
अलिबाग-मुरूड-रोहा मतदारसंघाबरोबरच रायगड जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्न आ. मीनाक्षीताई पाटील यांनी विधानसभेच्या वेशीवर टांगून सामान्यातल्या सामान्य रायगडवासियांना न्याय मिळवून दिला. नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न असो की खारबंदिस्तीचा प्रश्न. त्याला पोटतिडकीने विधानसभेत वाचा फोडली. सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक, पाचाड येथील शिवसृष्टी, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, महिलांच्या अत्याचाराविरोधात पेटून उठत विधिमंडळात रायगडची तोफ, बुलंद आवाज उठविला आणि सरकारला कोंडीत पकडले आणि न्याय मिळवून दिला. त्या नेहमी म्हणत, “वाहत्या पाण्याप्रमाणे कर्म करीत राहावे. कचरा आपोआपच किनार्याला लागतो. जीवनात दुःख तर येणारच, त्याला सोबत घेऊन जगला तोच सुखी होतो, समाधानी होतो.’’
पेझारी येथील स्व. भाऊंचे घर म्हणजे ‘पंढरी’. तिथे राजकारणी, समाजकारणी, खेळाडू, कलावंत, सरकारी अधिकारी आणि साधू पुरूषांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे आदरातिथ्य करताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून मीनाक्षीताई स्वतः जातीने लक्ष घालतात. कारण त्या म्हणतात, “अतिथी देवो भव.’’ घरात आलेला कुणीही निर्मुख जाऊ नये, हा त्यांचा कटाक्ष आहे. हिमालयाएवढ्या उत्तुंग यशामध्ये त्यांचे मोठे बंधू अखिल भारतीय जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, बहीण नंदाताई, स्व. भाऊ सुलभाकाकू आणि त्यांच्या कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे हे नमूद करावेच लागेल. अशा या मुलुखमैदानी तोफ, रणरागिणी, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, वक्तृत्वाची मौल्यवान देणगी लाभलेल्या या आमच्या अष्टपैलू भगिनीला 75 व्या वाढदिवशी लाख लाख शुभेच्छा.
-किशोर पाटील
आंबेपूर-पेझारी
9271036845