चिरनेरमध्ये शेती कार्यशाळेचा मेळावा

। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर येथील प्राथमिक केंद्र शाळेच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कौशल्य आधारित शेतमजूर प्रशिक्षण वर्ग व प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना संदर्भात शेतकर्‍यांसाठी शेती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजीपचे सदस्य बाजीराव परदेशी यांनी भुषविले होते तर व्यासपीठावर उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, सदस्य रमेश फोफेरकर, सदस्य संध्या ठाकूर, कृषिमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, कृषी पर्यवेक्षक एन.वाय.घरत, पनवेलचे कृषिनिष्ठ शेतकरी सज्जन पवार, विश्‍वनाथ थवळ, कृषी सहाय्यक के.पी.म्हात्रे, डी.टी.केणी, गाताडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कृषि मित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील व कृषी सहाय्यक के.पी म्हात्रे यांनी केले. यावेळी भात तयार होण्याच्या अवस्थेत असताना भाताच्या लोंब्यांवर पडणार्‍या रोगाची संपूर्ण माहिती व त्यावर करावयाचे उपचार काय व कसे करायचे त्याची संपूर्ण माहिती उपविभागीय कृषी अधिकारी ताटे यांनी दिली. तद्नंतर उरण तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी आळी रोग कसा तयार होतो आणि तो शोधायचा कसे यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उरण तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी हजेरी लावली होती.

Exit mobile version